आई माझी
आई माझी
दैवीय आंदण
मायेचं कोंदण
सुखाचं आंगण
आई माझी ......१
प्रेमाची भाकर
तृप्तीचा ढेकर
दुःखास पांघर
आई माझी ......२
पवित्र तुळस
नात्यांचा पळस
सौख्याचा कळस
आई माझी ......३
अमृताचे बोल
संस्काराचे मोल
संस्कृतीची ओल
आई माझी ......४
सोसूनीया कळा
उद्धारिते कुळा
पूजार्ह जिव्हाळा
आई माझी ......५
स्वत्व समर्पिते
मंदिरी तेवते
तेज उजळते
आई माझी ......६
ईश्वरीय देणे
वात्सल्याचे लेणे
शिवार देखणे
आई माझी ......७
गुरु आयुष्याचा
सुमेरू त्यागाचा
झरा चैतन्याचा
आई माझी ......८
भेदूनी निराशा
जागविते आशा
जगण्याशी दिशा
आई माझी ......९
मनाची महंत
नाही हो उसंत
फुलता वसंत
आई माझी ......१०
घरा घरपण
पूज्य समर्पण
अंधारा अंजन
आई माझी ......११
