सुखी जीवनाचा संघर्ष
सुखी जीवनाचा संघर्ष
खरंच सुखी राहण्याचा संघर्ष इतका जीवघेणा असतो का? की माणसं जगणंच नाकारतात. आपल्याच आजूबाजूला वावरणारी असंख्य माणसं मनात अपेक्षाभंगाचा ज्वालामुखी घेऊनच जगतात.
त्यांच्याशी किंचित जरी संवादाचा सेतू बांधला की, हा ज्वालामुखी शब्दांमधून फक्त आणि फक्त वेदना, आणि दुःखाचाच लाव्हा ओकू लागतो.
आयुष्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आणि त्यातही कधी कधी स्वतःच्या कुवती पलीकडल्या पण "हव्याच" हा अट्टहास.
अशांना त्यांच्या आयुष्याची कितीही सकारात्मक बाजू दाखवण्याचा प्रयत्न करा पण तो विफलच ठरतो. जे आहे त्याची यत्किंचितही किंमतही नाही की, जे मिळालंय त्याचा आनंदाने उपभोग घेणं देखील नाही.
"जगणंच" विसरलेली ही माणसं मग हा जिवंतपणाचा मुखवटा तरी कशासाठी मिरवतात? अशी माणसं मृतप्रायच नाहीत का?
त्यांना जे मिळालं नाही त्याच्यात "जीवन" दिसतं आणि जे मिळालं ते "गौण" वाटतं. रोगट तुलना आणि महत्वाकांक्षा नावाच्या भस्मासुराने त्यांच्या जगण्यातला आनंद हिरावून घेतला आहे.
सतत काहीतरी "हवंच" असण्याचा किती तो अट्टाहास. सुखाच्या शोधाचा दिशाहीन प्रवास अखंड सुरु आहे.
जरी "काहीतरी हवं असणं" हे जिवंतपणाचं लक्षण मानलं तरी त्यालाही पूर्णविराम हवाच की. पण माहित नाही त्यांच्या ह्या दिशाहीन प्रवासाला समाधानाचं क्षितिज कधी दिसेल.
आत्मिक तृप्तीचा स्रोत कधी गवसेल तोवर ही भटकंती अशीच सुरु राहून दुःखच देत रहाणार !
