सुगरणीचे घरटे
सुगरणीचे घरटे
सुगरण सुगरण
तिनं बांधलं घरटं
काडी काडी ती वेचून
झाडावरी ते उलटं
संसाराची विण सख्या
तुझी असे मेहनत
एक एक पातं रोवी
चाले नित्य कसरत
खोपा विणे सुगरण
काट्या कुट्यांचे कुंपण
बाभळीच्या झाडावर
करे पिलांचे रक्षण
इवलीशी चोच भरी
पोट तिच्या पिलांचे
क्षणोक्षणी येई तिस
बळ मिळे ग पंखांचे
सर्प घालीतो विळखा
सुगरण जाता रानी
चोची चोचीने घायाळ
करी सर्पास ते दोन्ही
पिलांसह घरट्याच्या
रक्षणास लावितसे
बाजी स्वतःच्या जिवाची
दोन्ही जीव लढतसे
देख सुटला सुटला
विळखा देख सर्पाचा
रक्त बंबाळ होतसे
शत्रू ग सुगरणीचा
लाज राखली देवाने
अशी रे मातापित्यांची
कष्ट प्रेम परीश्रम
धैर्यासह ममतेची
येवो हजारो संकटे
दोघे लढतील सदा
विण घरट्याची घट्ट
करतील ते एकदा
