स्पर्श (अष्टाक्षरी )
स्पर्श (अष्टाक्षरी )
स्पर्श इवल्या बोटांचा
मन माझे हेलावते
प्रतिबिंब त्याचवेळी
नेत्री तुझ्या तरंगते
स्पर्श इवल्या हातांचा
अंतरीचें आक्रंदन
कळे तुझ्या अंतराला
भेटतांच कणकण
स्पर्श इवल्या श्वासाचा
माझ्या हृदींचे स्पंदन
साथ कसे करी त्याला
मुकपणे माझे मन
स्पर्श इवल्या ओठांचा
फुले मोहोर आनंदी
करि वृष्टि चित्त तुझें
मधुमादक सुगंधी
भाव इवल्या डोळ्यांचा
तुला न बोलता कळे
तुझ्या माझ्या मिठीतूंन
तुझें गुज मला मिळे
स्पर्श इवल्या गालांचा
अमृतधारां जिव्हेसी
हासे भविष्य हे नेत्री
मन मोहरे सुवासी
इवलेसे लडिवाळ
जणू मधू पखरण
बाळ मधानें न्हाऊन
होई प्रसन्न उन्मन
पावलांचा पदरव
जणू सडा प्राजक्ताचा
बाळ खेळ कल्पनेचा
स्वाद गंधर्व गाण्याचा
काया इवलिशी अशी
खेळ आग उदकाचा
माया आभाळाची धरा
झंझावात पवनाचा
(पंचमहाभूते प्रत्येक व्यक्तीत अगदी जन्मतः वास करतात.)
