प्रेमाचा चाफा
प्रेमाचा चाफा
येई गंधाळुनी चाफा
प्रीत तुझ्यात रंगुनी!
मोहरला सखे चाफा
तुझ्या गंधात मिसळुनी!... १
ओंजळीत घेत चाफा
नजराणा दिला तुला!
भाव माझ्या मनीचा
नाही कधीच दिसला!...२
हरखून जाई चाफा
स्पर्शी मोद फुलताना!
अलवार मिटे डोळे
रुप तुझे पाहताना!...३
भेटे धरणीसी चाफा
मृदगंध मोहरतो!
तुझ्या स्पर्शात ग सखे
मनोमनी शहारतो!...४
गंध मंद भासे चाफा
ऋतू गंधित कुंचला!
तुझा गंध ओढ लावी
जीव तुझ्यात गुंतला!...५
बोले अबोल हा चाफा
बोल तुझेच आठवे!
तुझ्या ओठांचे हे गाणे
माझ्या हृदयात साठवे!...६
नव पल्लवित चाफा
बहरला साज नवा!
आठवणी जाग्या होता
प्रिये वेड लावी जीवा!... ७
सोनपरी सोनचाफा
माळवतो रेशमात!
आले सारे बहरून
प्रेम माझिया मनात!...८

