सोनसकाळ
सोनसकाळ
रम्य नभी उषःप्रभा
रवी उगवे गगनी
सोनप्रभा तेजाळली
तेजोनिधी रथातुनी (१)
वृक्ष वेली सोनसळी
गेल्या रंगात रंगूनी
फुले सोनेरी पिवळी
मनोमनी मोहवूनी (२)
सुप्रभाती कृषीवल
स्वार बैलगाडीवर
तालावरी घुंगरांच्या
वाट सरे सरसर (३)
बसे वृद्ध कट्टयावरी
घेई प्रभूनाम मनी
करी वंदन रवीला
सुखी ठेव दिनमणी (४)
गृहिणींची लगबग
कामे करती घाईने
श्वान कोंबडे उठले
त्वरे टिपतात दाणे (५)
रम्य उषःकाली शोभा
मंद वाऱ्याची झुळूक
धावे मन गावाकडे
दिसे चित्रात झलक (६)
