गुरूवीण दुजा.....
गुरूवीण दुजा.....
गुरुवीण दुजा
असा कोण नाही
गुरू एक आहे
सर्वज्ञही ||
गुरू मायेचा सागर
गुरू विद्येचे आगर
गुरू दाखवी वाट
जगण्याची ||
देण्या शिष्याला आकार
गुरू कष्टे अपरंपार
होई शिल्पकार
शिष्याचाही ||
गुरू रागवी प्रसंगी
शिस्त बाणण्या अंगी
जोडी नाते प्रेमाचेही
शिष्यासंगे ||
गुरू अनाथांची माय
गुरू भक्तीचाच ठाव
धरी छत्र सर्वांवरी
नेहमीच ||
गुरू सांगे तत्वज्ञान
प्रसंगी राखावे आत्मभान
करावे जीवन सुकर
सान्निध्यात ||
गुरू माझी माता
गुरू माझा पिता
गुरू एक दाता
प्रतिभेचा ||
गुरूस्थान अढळ
करावी भक्ती निर्मळ
गुरू दयेचा ओहोळ
पाझरावा ||
गुरूकृपेची महती
आता वर्णावी किती
जाणावी थोरवी
सदोदित ||
गुरू ईश सर्वांचा
रोज प्रेमे स्मरावा
आचरणी आणावा
गुरू उपदेश ||
गुरू आज वंदितो
गुरू चित्ती स्मरतो
ज्ञाने उजळतो एक
गुरूदीप ||
