संत
संत
कुठे शोधू देवा तुला,
दिसे ना तू राऊळात ..
पंढरीचा विठू माझा ,
नांदे संतांच्या घरात ..
विठू दळण दळितो ,
जनाबाई ओव्या गाई ...
दासा घरी रमलीगे ,
माझी वैकुंठाची आई ..
देव नाचे वाळवंटी,
नामदेव किर्तन करी...
खीर चाखली नाम्याची ,
तृप्त झाला माझा हरी..
नाथा दारी वस्त्रे धुतो,
तोची श्रीखंड्या बनला ..
संत कबिराच्या घरी,
शेला देवाने विणला ...
ऐसा भक्तीचा महिमा ,
दास विठ्ठलाला केले ..
सोडुनिया वैकुंठाला,
चक्रपाणी घरा आले ...