समर्पिता
समर्पिता
कन्यादान करून बाबांनी केले मला तुझ्या स्वाधीन।
तेव्हापासूनच माझे मन मी केले तुझ्याच अधीन॥
लाजाहोम झाला तेव्हा, केल्या माझ्या इच्छा स्वाहा।
मनाला समजावले मी, तुझ्याच रंगी रंगून राहा॥
सप्तपदी चालत होते, स्वर्ग-सुखाची सात पाऊले।
तूच राजसा मनात माझ्या , संसाराचे स्वप्न दाविले॥
हातात देऊन हात तुझ्या मी, आश्वासले मनी निरंतर।
प्रार्थितसे अन् मनी ईश्वरा, कधी येवो आम्हांत अंतर॥
पण सांग प्रियकरा, हीच आस का तूही तुझ्या मनी बाळगिशी?।
माझ्या संगे जीवन रंगवीत, संसाराचे चित्र रेखिशी?॥
आहे तुज ना विश्वास एवढा, मीच तुझी रे जीवनसाथी?।
संसाराची बाग फुलवीन, फुले सुगंधी तुझिया हाती॥
नको आपल्यामध्ये दुरावा, नको कधीही तंटा- खटका।
येऊ दे जर, कधी आला तर, मनी अचानक राग लटका॥
मीही रुसले, कधी हिरमुसले, सांभाळून घेशील ना मला ?।
जीवन केले तुलाच अर्पण; तू शिव, तुझी गौरी मी प्रेमला॥