हे भाव अंतरीचे
हे भाव अंतरीचे
जाणून साजणा घे हे भाव अंतरीचे ।
सांगू कसे मुखाने मी गूज ते मनीचे ।।धृ।।
झाल्या अचानक भेटी जेव्हा नदी किनारी
माझ्या मनात भरली सखया तुझीच स्वारी
जुळले तुझे नि माझे ते सूर अंतरीचे ।।१।।
जडली कशी कळेना प्रीती तुझ्या रूपावर ।
जगणे नकोच वाटे तुझ्याविन एक क्षणभर ।।
प्रतिबिंब रोज दिसते नयनी तुझ्या छबीचे ।।२।।
थंडी जरी या जीवाला हुडहुडी भरवते ।
तुझ्या विरहात मात्र मी रात्रभर जळते ।।
सांगू कुणास राया दुःख मम हृदयीचे ।।३।।
घेई कुशीत सखया आसुसल्या जीवाला ।
तुजविन जीव माझा मला नकोसा झाला ।।
मज सोसवेना आता अंतर एका घडीचे ।।४।।
तू श्याम सावळा अन् मी प्रेमवेडी राधा ।
मन झाले बावरे मज जडलीय प्रीतबाधा ।।
कान्हा पुन्हा घुमू दे ते सूर बासरीचे ।।५।।

