सल
सल
वाटेत चालताना काट्यात मी घसरले
सल राहिली जराशी, सारे जरी विसरले
मज वेड चालण्याचे, जखमाही फार झाल्या
रक्ताळल्या मनावर, आणखीच वार झाला
मग श्वास कोंडले अन्, घामात मी बुडाले
प्रत्येक ओळखीचे, का पाखरू उडाले
मजला अनोळखी मी, काही ना आज स्मरले
सल राहिली जराशी, सारे जरी विसरले
आधार शोधण्यासी, दृष्टी, दूरात गेली
पाउल वाट ती ही, केव्हा पुरात गेली
त्या धावत्या जलाला, मी बोलले जराशी
दाबून वेदना जी, मी ठेवली उराशी
डोळ्यास भार झाला, त्या आसवात झरले
सल राहिली जराशी, सारे जरी विसरले
तेव्हाच त्या जलाशी, एक स्नेह बंध जुळला
कित्येक भावनांचा, लाटेस गंध कळला
वाहून त्यासवे मी, गेले पुरात थोडी
ओठात गीत आले, आली सुरात गोडी
रंगात रंगुनी मी, आता जरी बहरले
सल राहिली जराशी, सारे जरी विसरले
