शिवधर्म
शिवधर्म
जीवनात दाखवली वाट
उगवली मंगल पहाट ;
शिवबा तुझे थोर उपकार
आली परिवर्तनाची लाट .
रयतहितासाठी केली
जुलमी सुलतानशाही नष्ट ;
स्वातंत्र्याचे विचार पेरूनी
शिवधर्म निर्मिला सुस्पष्ट .
अविरत, अपार संघर्ष केला
रक्तरंजित इतिहास घडवला ;
अभिमान वाटतो आम्हां
रयतेचा आधारस्तंभ झाला .
समता नांदावी म्हणून बांधले
समानतेच्या सूत्रात सकलांना ;
सर्व जाती-धर्म भाषिकांना
न्याय हक्क दिले अबालवृद्धांना.
सोनियाचे दिवस आले
भोग रयतेचे गळून गेले ;
स्वातंत्र्याची ज्योत पेटवून
अन्यायाला भस्म केले .
कर्मकांडांना दिली तिलांजली
विज्ञानवादाला आली भरारी ;
शिवबासम राजा होणे नाही
सोबत शिवानुभवांची शिदोरी .
वंदन तुमच्या चरणी
शिवपराक्रम आठवुनी ;
न्यायी शिवकाळ येऊनी
शिवशाही दिसावी नयनी.