शीर्षक नाळ तुझी माझी
शीर्षक नाळ तुझी माझी


काव्यप्रकार बाराक्षरी
नाळ तुझी मला, असे जोडलेली
चाहूल येताच, मी सुखावलेली (1)
हालचाल तुझी, जाणवे मजला
हळूच रे बाळा, कसे सांगू तुला? (2)
गप्पा किती मारी, मी तुजसंगती
हुंकार देऊनी, औत्सुक्ये ऐकसी (3)
पौष्टिक पदार्थ, नाळेने दिधले
गाठ तुझी माझी, नातेच सांधले (4)
जन्म दिला तुज, वाढविले प्रेमे
नाळेचे बंधन, घट्ट गोफ झाले (5)
शिक्षण होताच, कर्तृत्व बहरा
कृतज्ञ नाळेला, चेहरा मोहरा (6)
क्षितीजे विस्तारी, पंख पसरुनी
मागे न पाहसी, मान वळवूनी (7)
हळूहळू सारे, इथले धूसर
वेळ नसे तुज, सदा कार्यभार (8)
मोठा होता होता, लांबच गेलासी
पैलतीर मज, जवळ आलासी (9)
नाळेचे बंधन, आता वाटे तुटे
सुखी असो बाळ, माय मुखावाटे (10)