शब्दांचा किनारा
शब्दांचा किनारा
त्या दिवशी सरिता किनारी
आपण बसलो होतो
चार प्रेमाचे बोल बोलत
तेव्हा डोळ्यांत डुंबुनी माझ्या
हरवूनी जगी सा-या
तू भरून घेत होतीस
तुझ्या डोळ्यांत माझ्या डोळ्यांतली
खोल, अथांग सागरासारखी
'प्रीत'
अधरांवर सुमधुर अधर टेकवून
तू गात होतीस गाणे आपल्या प्रेमाचे
त्यावेळी सारे जग अबोल झाले होते
तुझ्या शब्दांना
वसंताचा बहर चढला होता'
तू बोलत होतीस मी ऐकत होतो
शब्दांत तुझ्या हरवत होतो
शब्दांना फुटता प्रीतीचा बहर
मी ही कधी नव्हे तो, शब्दांत गुंतलो होतो
तेव्हा वाटलं
तुला न सुचला तो शब्द कसला
तुझा जो न जुळला तो सूर कसला
तुझ्या रूपावर जो ना भाळला
तो खरा प्रियकर कसला
पण ते सारं क्षणिक ठरलं
तू गेलीस.
पण तो किनारा अजूनही तिथेच आहे
तुझ्या शब्दांवर भाळणारा
ज्याने ऐकले होते तुझे सारे शब्द
आता तोच देतो मला साथ
तुझ्या विरहात
'तुझेे शब्द ते मात्र राहिले
राहिले न फक्त
त्याचे सूर त्या किनारी
अन् या अंतरी मात्र राहिले.

