आसक्ती
आसक्ती
चांदरात गोंजारत उभा
सुने आभाळ जोखतो
डागाळलेले चंद्र कितीदा
मी काळजास माखतो ..।
उणी साथ रिती वात
नित्य अविनाशी जखमात,
निखळत्या तारका मी
उरी आशेने पाळतो ..।
मंद संथ रातीला
झुळूक गार साथीला
काजव्याचे उजाडणे
सप्तसूर छेडतो .....।
ठिबकते अर्ध चंद्रकोर
बिलगतेत धरा विभोर,
मुग्धतेचा गंधसाज
वृक्ष लतास सांगतो......।
कुणा मधुरतेचा भास
ना रात किड्यांचा त्रास ,
साहण्यास असह्य तडप
मन मीच माझे झोकतो ....।
कुंंकुमाचे लेवून भाळ
क्षितिजाची वाणी रसाळ
नित्य आसक्तीत त्यांच्या,
उभे जगणेच मी टाळतो.......।

