रमाई
रमाई
रमाई वलंगकराची लेक,
रमाई गरिबीतही नेक ,
जीवन वादळे झेलून,
रमाई भक्कम सागराचे टोक ।
रमाई लाखात एक देखणी
रमाई बहुजनाची लेखणी
संसार गाडा नेटाने ओढित ,
रमाई सर्वांची सुलक्षणी ।
रमाई त्यागाची मूर्ती
रमाई भिमाची किर्ती
पोटच्या गोळ्यांना देऊन मूठमाती,
रमाई अथांग मायेची भरती ।
रमाई अश्रूंची धार
रमाई निष्ठा करूणा अपार
अर्पिला जना देह प्रकाश ,
रमाई उजेडाचा पार ।
रमाई शीलाचे परिमाण
रमाई चारित्र्य गुणवान
नव्हत्या कष्टाला सीमा ,
रमाई साधनेचे इमान।
रमाई समस्ताचा अभिमान
रमाई भुकेल्या साठी धनवान
कोटी कोटीना उद्धारण्या ,
रमाई भिमाचे ऊर्जा स्थान ।
रमाई स्वाभिमानाची आण
रमाई संस्काराची खान
पीडित शोषित जनतेसव ,
रमाने अर्पीले पंचप्राण ।