मुग्ध प्रीत
मुग्ध प्रीत
तुझ्या निःशब्द ओठात
वाचले मी अस्फुट बोल
तुझ्या अस्वस्थ प्रितीत
रुणझुणले प्रेमाचे मनमोहक ढोल।।१।।
तुझ्या अबोल वाणीत
दडले एक रम्य प्रणयगीत
तुझ्या धुंद नजरेत
गवसली मज अनमोल प्रीत।।२।।
तुझ्या भावपूर्ण नेत्रात
मीलनाची तळमळ खोल
तुझ्या स्नेहमय दृष्टीत
श्रावण धारांची बरसात तरल।।३।।
तुझ्या मृदुल स्पर्शात
मयुरपिसांची ममता सरल
तुझ्या बेधुंद मिठीत
टपोर मोगरीचा वर्षाव चंचल ।।४।।
तुझ्या स्वप्नमयी दुनियेत
ठेवताच मी अलगद पाऊल
तुझ्या चितचोर हावभावात
मनी उठते अथांग काहूर।।५।।
तुझा सहवास भासे
चांदणभुलीची मौक्तिक माळ
संध्यासमयी जशी विलसे
नभी तेजस्वी नक्षत्रमाळ।।६।।

