शब्द जेव्हा मुके होतात
शब्द जेव्हा मुके होतात
भावना थिजू लागतात
विचार गोठू लागतात
मनाचे वितंडवाद तिथे संपतात.
जेव्हा शब्द मुके होतात....
मन शून्य होऊ लागते
बुध्दीचे ना काहीच चालते
सारे भ्रम तिथे संपतात
जेव्हा शब्द मुके होतात...
अपेक्षा न आशा असते
तक्रारीची ही भाषा नसते
दुःखाचे सारे ढगच विरतात
जेव्हा शब्द मुके होतात...
नावापुरते बाह्य जग उरते
अंतरीचे उणे ही नुरते
सारे सुंदर दिसते जगतात
जेव्हा शब्द मुके होतात...
मन ही मौन होते
बुध्दी जेव्हा गौण होते
प्रत्येक चेतापेशी जाग्या होतात
जेव्हा शब्द मुके होतात...
मन हलकेफुलके होते
फुलपाखरासम हवेत तरंगते
मनी चंद्र चांदण्या फुलतात
जेव्हा शब्द मुके होतात...
