काय हरकत आहे...?
काय हरकत आहे...?
गतकाळाच्या नौकेमधून
यावा एखादा फेरफटका मारून
वाटलं असं अधून मधून
.....तर काय हरकत आहे .....?
येतील दोन चार वादळे
कोसळून जाईल नौका
जाईल तोल थोड्यावेळा करता
आणि फुटलाच एखादा टवका
.....तर काय हरकत आहे .....?
काही पुसल्या असतील
काही पुसटशा दिसतील पाऊलखुणा
त्याच्यावरून पुन्हा एकदा चालण्याचा
झालाच थोडासा मोह
.....तर काय हरकत आहे .....?
लागतील काहीशा ठेचा
चिघळतील काही जखमा
हौसेनं थोडं रक्तबंबाळ व्हायला
....काय हरकत आहे ....?
नाही मिळाले आठवांचे मोती
घेऊन येऊ ओंजळीत रेती
साठले टपोर थेम्ब डोळ्यात
आणि आलं टचकन पाणी
.....तर काय हरकत आहे .....?
बरोबर चालून ही काही वजा आहे
चुका करण्यात ही थोडी मजा आहे
सोडलंच थोडं पाणी नियमांवर
.....तर काय हरकत आहे .....?
