वाटाड्या
वाटाड्या
आठवतो आज ही
अनोळखी अज्ञात व्यक्तीसोबतचा प्रवास
वेगात मागे पळणारी झाडे
आगगाडी नि हृदयाचे साडे माडे
वाढले ठोके धड धड धड
विषयाला मिळाले मग गाडीसारखं वळण
बुद्धीच्या जात्यावर आम्ही सारे
दळत होतो विचारांचं दळण...
बुद्धीच्या ऐरणीवर घासून विषयांना
केली मत मतांतराची चाळण....
तो अनोळखी पुरवत होता
स्वविचारांचा हेका
मी तरी कुठे सोडत होते
मुद्यांवरचा ठेका
उकल होत होती नवविचारांची
लज्जत वाढतच होती चर्चासत्राची
अबोल्यात होते अनोळखीपण
विरुन गेले हळूहळू
अनोळख्यातले अनोखेपण ....
वैचारिक एक युद्ध संपले
अखेर दिशा गवसली वाटसरूच्या विचारांची
वाटाड्याने जागा घेतली हळूच मित्राची ...
चर्चेतून सुरुवात झाली नव्या पर्वाची .....
पुन्हा जाग आली वास्तवाची
ती वेळ होती घरी परतण्याची ......
