जुळले संकटांशी धागे
जुळले संकटांशी धागे
श्रावणसरी झेलताना
कधी दाटून आले घन
डोकावले संकटांनी की
पडले सुखावर विरजण
होता मार्ग माझा नेहमी
सरळ सुंदर नि नेक
वेगात आली संकटे
सारी एकामागून एक
बेसावध असताना
केला माझ्यावर हल्ला
अशावेळेस आठवतोच
कुणा देव कुणा अल्ला
संकटांवर करणे न जमले
मजला कसली कुरघोडी
जावयाचे होते पैलतीरी
परि हरवली वादळात होडी
काही न कळाले संकटापुढे
रहाते बुध्दीही गहाण
बुडले भावनांमध्ये अशी की
अस्तित्व झाले लहान
संतप्त बंदरावर माझ्या
आल्या कोठुनी लाटा
गलबते उध्वस्थ झाली
चुकविल्या लक्ष वाटा
माझे मला कळेना
मी चालले रे कोठे
बुद्धी नि भावनांचे
जुंपले साटेलोटे
सारे गेले पुढे कसे
मी खचत गेले मागे
हातात हात घालून
जुळले संकटांशी धागे..
