सौंदर्याची खाण कोकण
सौंदर्याची खाण कोकण
निसर्गाची मुक्तहस्त उधळण
माझ्या महाराष्ट्रातील कोकण
अप्रतिम सौंदर्याची खाण
पाहता मनावरचा हलका होई ताण।। १।।
हिरवी हिरवी दाट झाडी
नागमोडी वळणाचे घाट
डोंगरद-यातून वाहे नदी
उत्तुंग असा सह्याद्री घाट।। २।।
उंच उंच डोंगरमाथा
पायथ्याशी सागर किनारा
अथांग सागर लाटेसंगे
थंड गार वाहे वारा।। ३।।
घर कौलारू दिसे छान
अंगणी तुळशी वृंदावन
गड किल्ल्यांची शानच न्यारी
प्रसन्न टुमदार मंदिर प्राचीन।। ४।।
निळाशार सागर किनारा
निळे निळे त्याचे पाणी
झावळ्यांनी शाकारलेल्या कुटीत
कोकण मव्याची मेजवानी।। ५।।
फणस पोफळीच्या बागा
वा-यासंगे झोकात डोले
माडांना बांधलेला झोपाळा
मस्तीत त्याच्या संथ झुले।। ६।।
दृश्य मनोहर कोकणाचे
भुरळ मनाला घालणारे
विलोभनीय सौंदर्याचा अर्थ खरा
साऱ्या जगास सांगणारे।। ७।।