सागरा
सागरा
कल्पनांची भरती आली सागराच्या किनाऱ्यावर,
विचारांच्या लाटा उसळल्या हळव्याश्या मनावर.
माड कसे हे शोभून दिसती तुझ्या ह्या काठावर,
सुंदर शिंपले चमकू लागतात असता भानू माथ्यावर.
पुनवेचे चांदणे दिसे फेसाळलेल्या लाटांवर,
सुवर्णाची शोभा उमटे असता सूर्य अस्तावर.
अनेक असती जीव जंतू जलचर तुझ्या पोटात,
व्याधी कशी न होई तुला नेहमीच असतो थाटात.
कोळ्यांना तू पुरवी मत्स्य धरतीला पाणी,
धावूनी जातो क्षणात तू ऐकता वरुणाची वाणी.
अद्भूत तुझे हे सामर्थ्य सागरा अमाप सारे पाणी,
कापू लागे धरणी थरथर जेव्हा येई त्सुनामी.
अफाट तुझे हे रूप बघून विचार माझ्या आला ध्यानी,
आचमन तुझे करू शकणारा खरंच का अगस्त्य मुनी.
