ॠणानुबंध
ॠणानुबंध
कधीकधी आयुष्यामध्ये
अनपेक्षित बदल घडतात
ना ओळख ना पाळख कधी कुणाची,
अशी माणसे अचानक भेटतात
नकळतच आपलीशी वाटतात
"आयुष्य" आपलं बदलायला जणू
ही माणसं आपल्या आयुष्यात येतात
नियतीने लिहून ठेवलेल्या या गोड क्षणात
योगायोगाने ऋणानुबंध जुळून येतात
ऋणानुबंधामुळे जुळतात मग नाती
प्रेम, जिव्हाळा, आपुलकी यामुळेच येती
नात्यांच्या मृद्गंधात
जीवनास लाभते सुंदरता
अलौकिक चांदण्याची जशी शीतलता
अतूट बंध असतील अनेक पण
ऋणानुबंध हे असे सर्वश्रेष्ठ
गत जन्माचे वा असो सात जन्माचे
नाते प्रेमळ हे महाश्रेष्ठ असे
रक्तांच्या नात्याएवढाच
आधार आयुष्यभर देतात
शब्दातून सुटेल पण हृदयातून नाही
रागात ही असताना प्रेमाची हाक
अन् बांधलेली ही एक रेशीमगाठ
रुसव्या-फुगव्याची गोडी सांगतात
सुख-दुःखात साथ देतात
मायेचा ओलावा जपून ठेवतात
जीवनामध्ये भरतात आकर्षक रंग
नाती अधिक घनिष्ठ करण्यास
साह्य करतात हे ऋणानुबंध
कृष्ण-सुदामा परी जुळलेले
ऋणानुबंध मित्रत्वाचे
विणलेले धागे हे विश्वासाचे,
मैत्रीचे ऋणानुबंध
करी आयुष्यास प्रफुल्लित
सुख ओंजळीत देई अखंडित
ओढ शब्दांना अलवार नितळ शब्दांची
निर्मळ जलापरि वलय गोड भावनांची
या हृदयापासून त्या हृदयी पोहोचते
गलबत भेट असते
ही खऱ्या गहिऱ्या ऋणानुबंधाची
आयुष्यांच्या धाग्यामध्ये बांधले जातात
अनंत नात्यांचे सुंदर मोती
ठेवले ऋणानुबंध हृदयात
जपुनी तर अधिक
सुखावतील जीवनातील नाती
ऋणात राहू ॠणकर्त्यांच्या
बांधू ऋणानुबंधांच्या रेशीमगाठी
अपूर्ण प्रीत पुष्पे चरणी, जपू त्यांना शतजन्मासाठी...
