रेशमी सरी
रेशमी सरी
सावळे सावळे मेघ
रेशमी सरींनी बरसले
थेंब हिरव्या पानांवर
कसे ओळीने बसले||१||
नखशिखांत भिजली भुई
मृदगंध दरवळे
डोंगरातून वाहे नदी
जाऊन सागरास मिळे||२||
धुके विणले आभाळाने
अदृश्य झाडवेली झाले
जणू डोंगराने त्या
अंगी भस्म फासले||३||
ओल्या ऊन-पावसाने
इंद्रधनु साकारला
मनमोहक मयूराचा
पिसारा सुंदर फुलला||४||
गवताची पोपटी पाती
वाऱ्यासंगे डोलतात
नाजुकशी रानफुलं
हिरवळीत शोभतात||५||
सूर्यही भिजला जणू
त्याची आगही विझली
प्रसन्नता शांत शीतल
सृष्टीसंगे मनं मोहरली||६||