रेशमी बंध
रेशमी बंध
रेशीम धाग्यांनी गुंफले
नाते तुझे नी माझे
रक्षण्या मजला देवाने
तुजला जगी पाठवले...
सण रेशमी सुखाचा
बंध हे मायेचे प्रेमाचे
धाग्या-धाग्यातून ओसंडते
बहिण-भावाचे विश्व सारे...
श्रावण आला जवळी
लागे माहेराची ओढ
रक्षाबंधनाचा सण
मनी स्मृतींची रूणझूण...
तू केंव्हा रे येशिल
दारी चारदा पहाते
गाडी पाहून लांबून
मनोमनी सुखावते...
तूझे रूपडे प्रेमळ
माझ्या डोळा पाणी येते
तूला आनंदी पाहून
मनापासून सुखावते...
पिल्ला भाचरांचा दंगा
आत्या आली हे बघून
जणू वाटते गोकूळ
झाले माहेर हे सारे...
निरांजन तेजाची
मांगल्याचे कुंकू घेते
सुपारी सौख्याची
घेते अक्षता प्रेमाची...
औक्षवंत होण्या तुजला
मी औक्षण हे करीते
किती प्रेम बहिणीसाठी
हे तुझ्या डोळ्यात वाचते....
तू तृप्त मी तृप्त क्षणभरी
रेशमी बंध मी बांधिते
जणू सूख हे स्वर्गिचे
त्या धाग्याने अनुभवते...
नाते हे भावविभोर
आई- बाबा दुरून पहाती
पाहून बंधूभगिनी प्रेम
आशिर्वाद लाख देती....
तू मायेनं आणली
साडी मजसाठी भाऊराया
नाही सर तिची कशाला
आवडीने जपेन तिजला...
सोहळा हा सौख्याचा
अनुभवते सानंदाने
मी मागते देवाकडे
सूख राहो शाश्वत तूझे...
