विरह
विरह
मैत्री तुझी नी माझी
आहे सुखद भाववेडी
मन बावरे कसे रे
गुंतले जसे मधाशी
तू ऋतू पावसाळी ओला
मी चिंब संध्या पश्चिमेची
गाणे आर्त विरहाचे
मिळे आतूर भैरवीशी
तूला गाता सुरांतुनी मी
रे कणकण व्यक्त होते
तू मित्र युगायुगांचा
सौख्य हे नित्य स्मरते
राहशी दूर मित्रा
मजपासूनी दूर देशी
का वहावे अश्रू खारे
तव आठवांनी नित्य दिवशी
नकळे भान जाते
स्मरता मनी तूला रे
काहूर उठते अनावर
मी होते मुकी स्वतःशी
विरह हा तुझा मला रे
छळतो तुलाही का असा रे
मैत्र दोन जीवांचे भाबडे हे
न साहवे अंतर मिलनातले
तू आठवतो नित्य दिवशी
जसा सुर्य येतो दारापाशी
मी वेचते किरण अलगद
जणू वेचते क्षण भेटीतले
धरित्री ही नित्य फिरते
रवीच्या कक्षेभोवती
मन तसेच माझे फिरते
तुझ्याच आठवांभोवती
नको दुरावा हा असह्य
ये ये फिरूनी घरकुलाशी
मी तुझीच कालही होते
सखी तुझीच प्रिया आजही

