राखी एक चिंतन
राखी एक चिंतन
भावनांचा फुलोरा राखीने गुंफला
भावाच्या भेटीने दिवस हा रंगला..१
गरज खरेच का धाग्याच्या बंधाची
रक्ताच्या नात्याला प्रतिकाच्या रंगाची..२
आठवण का द्यावी,भावाला बहिणीची
असुन मुले एकाच रे आई वडिलांची ...३
अपमान वाटे हा बालपणीच्या मैत्रीचा
करेल का बरोबरी ,धागा हा राखीचा...४
असावी ही योजना भाऊ बहिण भेटीची
का हवी बहिणीला साडी जरी काठाची...५
करी खुष बहिणीला देऊन देणगी
उडे कधी भावा बहिणीत ठिणगी....६
हळुहळु जसे मग बंध तो रेशमाचा
रक्ताच्या नात्याला येई गंध हेव्याचा....७
वाढेल वय रमली मुलासंसारात बया
भावनांच्या फुलो-याची खाक झाली रया...८
चुकून मारून भेट होई त्या दोघांची
अन् अश्रुत तुटून पडे बंध रेशमाची ...९
व्हावे कसे उतराई या अतूट बंधनाचे
आईची आम्ही मुले तुझ्याच अंतरीचे...१०
