पुन्हा नव्याने जगायचे तू
पुन्हा नव्याने जगायचे तू
जीवघेणा पूर आला पाडसा पोहायचे तू
साचलेले पावसाचे बांधही फोडायचे तू
खूप झाले नेहमीचे हारणे तू जिंकतांना
हारलेले डाव सारे यापुढे जिंकायचे तू
रान आहे पेटलेले धावण्याला वाट नाही
जीवनाच्या आहुतीला द्यायचे टाळायचे तू
स्वाभिमानी हो जरासा खूप झाली मानहानी
टोचणारे शब्द त्यांचे तत्क्षणी खोडायचे तू
सर्प सारे ते विषारी जीवघेणा दंश त्यांचा
जहर त्यांचे धाडसाने लाडक्या काढायचे तू
जीवनाचे रंग आहे भावणारे देहचित्ता
रंग आहे खूप सारे साजरे रंगायचे तू
रात्र आहे लांबलेली सूर्य आता दूर नाही
भास्कराला पाहण्याला राजसा जागायचे तू
