प्रश्न
प्रश्न
काही काही प्रश्नांना उत्तरच नसतं
असं का तसं का विचारायचं नसतं
जसं आहे तसं स्विकारायचं असतं
दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावायचं नसतं
तुलनेच्या फंदात पडायचं नसतं
त्याचं कसं माझं कसं म्हणायचं नसतं
संकट पाहून कण्हायचं नसतं
काही काही प्रश्नांना उत्तरच नसतं
जसं आहे तसं स्विकारायचं असतं
आव्हानाला भिडायचं असतं
संकटाशी लढायचं असतं
नसेल साथ कोणाची तरी रडायचं नसतं
माणसं पारखायला शिकायचं असतं
काही काही प्रश्नांना उत्तरच नसतं
जसं आहे तसं स्विकारायचं असतं
तीच तीच स्थिती रोज थोडी का रहाते!
प्रत्येक तिथी तर बदलतंच असते
बदल हा सृष्टीचा नियम आहे
ताठरता आपलाच अहं आहे
काही काही प्रश्नांना उत्तरंच नसतं
जसं आहे तसं स्विकारायचं असतं
आयुष्यात कायम अंधःकार का असतो!
भविष्यात उगवणारा उषःकाल नसतो?
प्रसंगाप्रमाणे बदलायचं असतं
उद्याच्या स्वप्नांनी खुलायचं असतं
काही काही प्रश्नांना उत्तरच नसतं
जसं आहे तसं स्विकारायचं असतं
आनंदाचे क्षण आठवायचे असतात
हर्षाचे मधुकण साठवायचे असतात
आशेचे दीप लावायचे असतात
अन् त्याच शिदोरीवर कठीण प्रसंग निभावायचे असतात
काही काही प्रश्नांना उत्तरच नसतं
जसं आहे तसं स्विकारायचं असतं
नव्या उमेदीनं उभं रहायचं असतं
तावून सुलाखून झळाळायचं असतं
अन् अस्तित्व आपलं पुन्हा निर्माण करायचं असतं
अस्तित्व आपलं पुन्हा निर्माण करायचं असतं
