आधुनिक भोंडला
आधुनिक भोंडला
बाळ घालितो लोळण, आई आली ती धावून
काय पाहिजे बाळा तुजला,देते मी आणून
आई मला मोबाईल दे आणून,त्यावर गेम मी खेळीन
असलं रे कसलं मागणं, सायकल देते मी आणून,
ताकद कमव तू चालवून
बाळ घालितो लोळण, आई आली ती धावून
काय पाहिजे बाळा, तुजला देते मी आणून
आई मला पिझ्झा दे आणून, भरपूर चीज दे घालून
असलं रे कसलं मागणं, पौष्टिक अन्न देते रांधून,
सुदृढ होशील तू मग
बाळ घालितो लोळण, आई आली ती धावून
काय पाहिजे बाळा, तुजला देते मी आणून
खरेदी करूया मॉलमधून, ब्रॅण्डेड कपडे घेऊया तेथून
असलं रे कसलं मागणं,पिगि बॅंक देते मी आणून
पैसे जमव बचत करून
बाळ घालितो लोळण, आई आली ती धावून
काय पाहिजे बाळा, तुजला देते मी आणून
टी.व्ही.रिमोट दे आणून, वेबसिरीज बघीन
असलं रे कसलं मागणं , पुस्तकं देते मी आणून
ज्ञान मिळव तू त्यातून
पटलं गं आई म्हणणं तुझं, तसाच मी वागेन
तसाच मी वागेन
