जीवन
जीवन
जीवन अतिशय सुंदर आहे,
मानलं तर लखलखणारं झुंबर आहे
बहरलेली शेतं आहेत, डोलणारी फुलं आहेत,
भ्रमराचं गुंजन आहे
आकाशाचे विभ्रम आहेत,
इंद्रधनुची कमान आहे, पावसाचं सिंचन आहे
जीवन अतिशय सुंदर आहे,
मानलं तर लखलखणारं झुंबर आहे
तान्हुल्याचं निरागस हास्य आहे,
निरामय आयुष्याचं भाष्य आहे
तारुण्याचा उन्मेष आहे, प्रौढांचं चिंतन आहे,
वृद्धांचं स्मरणरंजन आहे
जीवन अतिशय सुंदर आहे,
मानलं तर लखलखणारं झुंबर आहे
सुख आणि दुःख त्याचेच लोलक आहेत,
हास्य आणि रुदन त्याचेच बोल आहेत
आशा आणि निराशेच्या हिंदोळ्यावर झुलत आहेत,
म्हणूनच जीवनाला रंग आहे
जीवन अतिशय सुंदर आहे,
मानलं तर लखलखणारं झुंबर आहे
