पाऊस
पाऊस
ये रे बा पावसा तुझी पाहतो मी वाट
तुझ्याविना सुना माझा रिकामा रहाट
कधी धरतीवर पाण्याचे रे वाहतील पाट
माझ्या आयुष्याची कधी उगवेल पहाट
का रे तुझी पावलं इतुकी रेंगाळली
तुझ्याविना माझी काळी आई तहानली
घरातील माझ्या कच्ची बच्ची भुकेजली
ताज्या चाऱ्यासाठी बघ गुरं आसुसली
बेभान झालं वारं पडे गडद अंधार
आसमंत झाला शांत ओथंबलं हे आभाळ
झरझर पडती थेंब वाहती पाण्याचे ओघळ
भरुनी गेले सारे नद्या नाले नि ओहोळ
अरे बा पावसा तुझे किती मानू मी आभार
तुझ्यामुळे झाली भारी सृष्टी हिरवीगार
