प्रणय समाधी
प्रणय समाधी
तो---तुझे माझे दोन्ही हात ,
मिळुन या चार झाले .
झाली गुंफन हाताची ,
डोळे माझे जडावले ....१
स्वर्ग सुख वाटे आले ,
आता माझ्या नशिबात .
काय पाहू या जगात ?
हात तुझे या हातात .....२
ती---समाधान विलसते ,
सख्या तुझ्या मुखावर .
तेच पहाण्या टेकली ,
हनु तुझ्या खांद्यावर .....३
माझ्या हाताचा विळखा ,
सदा तुझा पाठीराखा .
लपेटून घेते तुला ,
तुच माझा प्राण सखा.....४
तो---सखे मुक्त कुंतलात .
माझी नजर गुंतली .
केसातील जाई-जुई ,
मला गुपित बोलली ....५
श्वासा संगे उधळण ,
मुक्त सुगंधाची झाली .
गाल आणि ओठावर ,
चढे आगळीच लाली......६
ती---सख्या पहाणारे जरा ,
माझे मधाळ लावण्य .
जरा समजून घे ना ,
नजरेतले आव्हान ......७
तुझे हास्य पाहुनिया ,
वेडावले माझे मन .
तुझी प्रणय समाधी ,
मीही झाले रे उन्मन ......८
तो---सखे अशीच हसत ,
राहा माझ्या डोळ्यांमध्ये .
माझ्या मिटल्या डोळ्यात ,
तुझे हास्य सामावले .....९
जन्मांतरी काढू नको ,
गळा गुंफलेले हात .
क्षण असाच थांबू दे ,
मला राहूदे स्वर्गात ......१०