हिरवा चुडा
हिरवा चुडा
माझ्या हाती हिरवा चुडा,
गोऱ्या रंगाला शोभतो
चुडा भरलेले हात,
बाप कौतुके पाहतो .....१
माझ्या हाती हिरवा चुडा,
माय नेत्री अश्रू दाटे
हात घेता माझा हाती,
मनी कृतार्थता दाटे .....२
माझ्या हाती हिरवा चुडा,
बहिणीला हुरहूर
मन कावरे बावरे,
पापणीला येई पूर .....३
हाती हिरवा चुडा,
थट्टा करीतसे भाऊ
मनामध्ये म्हणतोया,
ताई दूर नको जाऊ .....४
माझ्या हाती हिरवा चुडा,
सासू हरखे मनात
सुखी संसाराचे सार,
सांगे गुपित कानात ....५
माझ्या हाती हिरवा चुडा,
किणकिण वाजे भारी
वाट सोडता सोडेना,
उभी दारातच स्वारी ....६
माझ्या हाती हिरवा चुडा,
समृद्धीशी सांगे नाते
रंग पाचूचा लेवून,
गीत संसाराचे गाते .....७
माझ्या हाती हिरवा चुडा,
देवा औक्ष त्याला मिळो
राहो अखंड हातात,
इडा पिडा सारी जळो ......८
