प्रेम असं
प्रेम असं
मी अजानुबाहु असलो ना
तरी मी नाही तुला कवेत घेऊ शकत...
तुझ्या पापण्यांच्या आड
लक्ष नक्षत्रांचं टिपूर चांदणं,
आणि मी कायम अंधारकोपरा !
मोगऱ्याची साडी नेसून तू येतेस...
आपादमस्तक सुगंधित होऊन !
मी उन्हातान्हातला गुलमोहर....
मला फक्त एकदा कवेत घेशील ?
मलाही व्हायचंय तुझ्यासारखं !
तुझ्या पावलांना लक्ष गुलाबापाकळ्या ...
आणि माझ्या टाचाच भेगाळलेल्या !
मला ओंजळीत झेलून घ्यायचेत
तुझ्या केसांवरून ओघळणारे दवाचे थेंब !
तुझ्या केसांतून झिरपणारा गंध
साठवून ठेवायचाय मनाच्या कुपीत...
मला फक्त एकदा कवेत घेशील ?
तुझ्या मनाच्या नितळ आकाशात
मनसोक्त हिंडायचंय मला..पंख पसरून !
अगदी जवळून पहायचेत तिथे दाटलेले कृष्णमेघ
तुझ्या श्वासाच्या मल्हारात मला सचैल व्हायचंय
मला फक्त एकदा फक्त एकदा कवेत घेशील ?

