फुंकर
फुंकर
ओठातून गेला शब्द
जसा बाण सुटला धनुष्यातून
वाक्यामागून वाक्य गेले
जसे बाणामागून बाण सुटले
एक एक शब्दाने
एक एक वाक्याने
घायाळ मी त्यांना केले
वाटलं क्षणभर मला
विजय झाला आपला
त्या उन्मादाच्या मस्तीला
कोण साथ देई मजला
गरज नाही कोणाची
वाटून गेले मनाला
वाटेल तसे वागलो
वाटेल तसे बोललो
पण कोणासमोर मी
कधी नाही झुकलो
माझा गर्व उन्मत्त
दुरावले स्नेही आप्त
मनात बांधली भिंत
उंच उंच अगदी उंच
पण ......
एका व्याकूळ लाटेनं
नेलं सारं वाहून
मन माझं आता
पार गेलयं होरपळून
आसरा हवाय मला
तुझ्या हळव्या शब्दाचा
हळूवार फुंकर घालण्या
कुण्या प्रेमळ माणसाचा