राजे शिवछत्रपती
राजे शिवछत्रपती
महाराष्ट्र मातीवरी, होता वावर शाह्यांचा
आपसात लढतांना, अतिरेक जुलूमाचा
होती जनता जर्जर, दुःख हाल अपेष्टेने
केले जवळ साऱ्यांना, मोठ्या माया ममतेने
स्वराज्याचा दिला मंत्र, मनी पेरला विश्वास
स्वराज्यात प्रजा सारी, घेई मोकळाच श्वास
बाजी येसाजी तानाजी, लाभलेत सवंगडी
उभारण्या स्वराज्यास, साथ त्यांची हरघडी
ज्याचे किल्ले त्याचे राज्य, तत्व राजांनी जाणले
शत्रूसाठी किनाऱ्याच्या, आरमार उभारले
गड किल्ले जिंकलेत, विस्तारले हे साम्राज्य
जनतेच्या मनातही, होते असेच स्वराज्य
हर एक तो मावळा, स्वराज्यासाठी जगला
शिवबांच्या सुराज्यात, अलगद सुखावला
लेकी बाळी सुरक्षित, होत्या साऱ्या स्वराज्यात
शेतकरी कारागिर, होते सारे आनंदात
केले उत्तम शासन, दक्ष प्रजाहिता साठी
योद्धा उत्कृष्ठ सहिष्णू, जगालात प्रजेसाठी
वंद्य आजही आम्हास, राजे शिवछत्रपती
दाही दिशास जयांची, सारे गातात महती
