पायवाट
पायवाट
भासे आतुरली पायवाट
वाटसरूंच्या स्वागतास
न भरकटता ठरविलेले
ध्येय वळण गाठण्यास
एकाकीपण जाणवू नये
म्हणून करते साथ संगत
रानपाखरांची किलबिल
नि सुगंधी फुलांची रंगत
वाराही लागतो गुणगुणू
अन् तरूवेली धरी ताल
काळ्याशार मातीवरती
पायांची संगीतमय चाल
क्षितिजच येई पाठीमागे
अन् मिहिर दाखवी वाट
स्वार होवूनी ढगांवरती
स्वप्नांशीच बांधली गाठ
सुखावह गारवा देणारी
आठवांची ती उजळणी
नकळत होत जाई मनी
सुप्त विचारांची मळणी
पायवाट फुलवी अलगद
हृदयी सृजनाचा पिसारा
अनोखा आभास हवासा
आवरी भावनांचा पसारा