पाहू रे किती वाट
पाहू रे किती वाट
मन झाले हो चिंतित
आता शिवार तापलं
लई भेगाळली भुई
द्येवा कवा गंधाळलं ? (1)
वृक्षवल्ली का तोडली ?
-हास पर्यावरणाचा
वसुंधरा झाकोळली
दोष सारा मानवाचा (2)
लागे नजर आभाळी
जाती नक्षत्रे कोरडी
नद्या विहीरी आटल्या
पिके पडली उघडी (3)
कर्ज होय पिकापायी
काय करु उमजेना ?
पीक नाही उगवलं
कसे सांगावे सुचेना ? (4)
फक्त एक मार्ग दिसे
मला आता सुटण्याचा
फास घेताच सुटेल
प्रश्न आयुष्यभराचा (5)
गुरेढोरे भुकेलेली
पोरं चेहरे टाकून
अशामधी मृत्युसुद्धा
कसा घेईल वेढून ? (6)
असे जगणे-मरणे
देवा अवघड झाले
कर वर्षाव रे आता
प्राण कंठाशीच आले (7)
