नवलाई गावाकडची
नवलाई गावाकडची
काय करु नवलाई,
ती माझ्या गावाकडची
भरजरी गावरान
चोळी नि परकराची ।।धृ।।
अल्लड परी उडती
डाबडुबली प्रितीची
नारळ्या पाड लागती
शेंदरी गोटी आब्यांची।।१।।
नदी पल्याड लवण
गम्मती थोडी चोरीची
ओटीतील तो खाऊ
गाभूळल्या त्या चिंचेची।।२।।
पांदन झाकी पाहुणी
ते गांव हरपण्याची
गाय रज अंगी माखी
पावडर संस्कृतीची ।।३।।
मोह फुले गोड किती
आंब्याच्या अढीच्या अढी
जत्रा यात्रा अशा येती
सदाही वरदळीची।।४।।
गाव कोस बारामाही
शेती हुरडा पार्टीची
दाळ रोडगे सदाही
ठेचा बेसन भाकरीची।।५।।
पारं सकरुबा आणि
आठवडी बाजाराची
इबलिस पात्र आणि
भले बलुते दाराची।।६।।
खालतली नि मधली
वरची नि शेवटची
गोठ भारी ती आळीची
चढाओढ उत्सवाची।।७।।
कसे होऊ उतराई
खर खुर जगण्याची
ल्ई भारी सुखविते
नवलाई तिकडची।।८।।
