नवजीवनाचा बहर
नवजीवनाचा बहर
का रे मानवा झालास कृतघ्न
मिटवू पाहतोस आमचेच अस्तित्व
सरेआम आमची अशी कत्तल करशील
तर तू कसा काय मोकळा श्वास घेशील?
तुझे साम्राज्य स्थापिण्यासाठी
आमची पाळेमुळे उपटून बिनधास्त टाकतोस
अरे जाणीव कशी नाही तुला
आमच्यामुळेच तू प्राणवायू मिळवतोस
आठव तुझे बालपण सारे,जे माझ्या छायेत खेळत गेले
मित्रमैत्रिणींच्या गप्पांचे कट्टे माझ्या साक्षीने रंगत गेले
माझ्या फळांचा आस्वाद घेत,तू हळूहळू मोठा झालास
एका एका फळासाठी माझ्यावर दगडांचा वर्षाव केलास
पण तुझ्या चेहऱ्यावर विलसणारा आनंद पाहून
मी सुद्धा खुष व्हायचो
रक्तबंबाळ होऊन ठणकणाऱ्या शरीराच्या वेदना
तुझ्या सुखाखातर विसरून जायचो
आज तू एसी मध्ये बसणारा साहेब झालास
माझ्या शीतल छायेची तुला गरज नाही उरली
औद्योगिक वसाहती स्थापण्यासाठी तुला
माझेच अस्तित्व संपवण्याची कल्पना स्फुरली
प्रहार करण्या माझ्या अस्तित्वावर
तू सहजपणे सिद्ध झालास
पण हे पाऊल तुझ्याच विनाशाचे
हेच कसे काय विसरून गेलास
एकेक वृक्ष तोडून तोडून तू स्वतः च्याच आयुष्याचा विध्वंस केलास
प्राणवायू विकत घेताना मात्र तू पुरता मेटाकुटीस आलास
पर्यावरणाने तुला सर्व काही दिले,पण तुझी ओंजळ कधी भरलीच नाही
कृतघ्नतेची वृत्ती तुझी,अंतरीची हाव काही फिटलीच नाही
एकेक वृक्ष वाढण्यासाठी, कित्येक वर्षांचा काळ लोटतो
लाखो वृक्षांची कत्तल करण्या अल्पावधीच पुरेसा ठरतो
पर्यावरणाची करून हानी,तूच आपत्ती ओढवून घेतली
समस्त मानवजातीला विनाशाच्या खाईत लोटून
मानवा तू अशी कोणती रे प्रगती केलीस?
बेछूट कत्तली झाल्या आमच्या पण त्यामुळे
प्राण तर तुझेही आलेच की आता कंठाशी
ऑक्सिजनचे नळकांडे नाकात असूनही
कित्येकजण मुकले आपल्या प्राणांशी
मोफत मिळणारा प्राणवायू तुला कधीच मोलाचा वाटला नाही
वृक्षसंवर्धनाचा वीचार का तुझ्या मनाला पटला नाही?
म्हणूनच सांगतोय आतातरी हा वेडेपणा सोडून
आमच्या संगोपनासाठी घे पुढाकार
आम्ही आहोत या जीवसृष्टीचे सदासर्वकाळ शिल्पकार
वृक्षारोपण करून हिरवागार कर सारा परिसर
शुद्ध आणि मोफत प्राणवायूने
तुझ्या नवजीवनास येईल पुन्हा बहर.
