नमन होलिकादेवी
नमन होलिकादेवी
सरे थंडीचा मोसम
उष्ण वातांचा चटका
चालू होई पर्णगळ
आला होळीचा झटका (१)
पर्णगळ चहूकडे
वृक्ष निष्पर्ण उघडे
झळ उन्हाची गं पोळे
सण होळी आला गडे (२)
असे मुहुर्त गोरज
जन सारे गोळा होती
भावे वंदन करुनी
पूजा नैवेद्य अर्पिती (३)
पूजा होलिकादेवीस
होई प्रसन्न भक्तांस
नाश अमंगल करी
देई चेतना सर्वांस (४)
आज पुरणपोळीचे
खास महत्त्व मानिती
अपवित्र जळो सारे
भावे भक्त विनविती (५)
सण वर्षअखेरचा
चाले धूमधडाक्यात
डफलीच्या तालावर
देती आरोळ्या गर्जत (६)
होळी आली आनंदाने
रंगलेले सान-थोर
मेळ्यामधे रंगारंग
मन उसळे विभोर (७)
धुळवड खेळण्यासी
जन उत्साहाने गोळा
रंगे होलिकाउत्सव
थाट आगळावेगळा (८)
नित्यनेमे पूजनाने
वर देई होलीमाता
बहराव्या तरु-लता
लाभो सर्वां समृद्धता (९)
