नको पैशाची हाव
नको पैशाची हाव
थांब जरा मित्रा इथे
नको ही धाव धाव.
प्रलोभनाना नको भुलूस
नको करूस हाव.
किती असा धावशील
तू पैशाच्या मागे मागे.
सोड सारा हव्यास
आतातरी व्हावे जागे.
पैशामागे जाऊन
सुटतील सुखाचे क्षण.
कितीही मिळवलास
तरी भरणार नाही मन.
धनाच्या लोभाने
होशील बेभान.
विसरशील भलेबुरे
उरणार नाही भान.
वाढेल आसक्ती
फुटतील हजार वाटा.
दुःखाच्या खड्ड्यात
पडायचा धोका मोठा.
म्हणूनच जरा मित्रा
वेळीच हो सावध.
नाहीतर ही हाव
करेल तुला गारद.
