बापाचं काळीज
बापाचं काळीज
जेव्हा माझं बोट धरून तू
पाहिल्यानंदा शाळेत गेलास
एकट्याला सोडताना तेथे
मन माझं गलबलून गेले होते.
तुझ्या निष्पाप डोळ्यात कित्ती
अश्रू जमा झाले होते.
समजावलं खूप मनाला आणि दगड ठेवला काळजावर.
तुझ्या भविष्याचा विचार करून, पुसले तुझे डोळे आणि समजावले तुला.
माझ्या साठीच कठीण दिवस आजही आठवतोय मला.
आज चित्र जरा पालटलय.
जागा झाल्यात बदली आणि आज मी तुझे बोट धरलेय.
हे तू मला कुठे घेऊन चालला आहेस!
मी इतका का झालोय जड तुला की मला आता तुझ्या घरात जागा उरलीच नाही.
घरा बरोबर मनात ही नाही का रे तुझ्या अजिबात जागा!
खरंच मी आहे निवांत , नाही करत उगाच त्रागा.
नेतोस तिकडे साऱ्या सोयी आहेत का जरा बघून ठेव.
मी घेईन रे चालवून पण तू येशिल ना तेव्हा तुला त्रास नको. कारण तडजोडीची सवय नाही आहे तुला.
म्हणून आज ही मनात तसंच गलबलून आलंय मला.
