नियम
नियम
कुठे उमलते फुल वेलीवर
कुठे निखळतो तारा
कुठे जन्म तर कुठे अंत
हा नियम या संसारा...
रोज प्रभाती रवी भूमीवर
रंग घेऊनी आला
दिन सरता हे रंगही सरले
अंधार ठेवूनी काळा
दिवस रात्रीचा खेळ रंगला
गगनाचा गाभारा
कुठे जन्म तर कुठे अंत
हा नियम या संसारा...
कुठे भूमितून बीज अंकुरे
गीत निजवते बाळा
कधी कळेना कसा कोठूनी
काळ घालतो घाला
कुणी येतसे कुणी जातसे
जग हे एक निवारा
कुठे जन्म तर कुठे अंत
हा नियम या संसारा...
कुठे मनाच्या जुळती गाठी
कधी फुलती अंगार
कधी विसावा झाडही होते
खांद्यावरला भार
कुणी भरावा रंग अन्
पुसतो अवचित वादळ वारा
कुठे जन्म तर कुठे अंत
हा नियम या संसारा.....
