नाच गं घुमा
नाच गं घुमा


सकाळी उठते मी लवकर
वेदनेवर घालते मी फुंकर,
आवरते मी भरभर
तरीही माझ्या माथी किरकिर
नाच गं घुमा.........
कशी मी नाचू?
पडले पिणाऱ्याच्या गळी
करून संसाराची होळी.
नवऱ्याचं व्यसन मला छळी
मार खायची रोजच माझ्यावर पाळी
नाच गं घुमा........
कशी मी नाचू?
बलात्काराच्या जगात
ना पाहिला मी कधी स्वत:चा स्वार्थ,
संधीसाधू व्यवहारात
माझ्या जगण्याचं ध्येयच परमार्थ
नाच गं घुमा.........
कशी मी नाचू?
बाॅस वागवी पशूसमान
सहन करते अवमान
परंपरेचा वसा घेऊन
केले संस्कृतीचे जतन
गुलाम होऊन स्वत:ला घातले अनेक बंधन
नाच गं घुमा........
कशी मी नाचू?
ठरले मी असुरक्षित
स्वत:च्या बापाच्या दुनियेत,
मित्रांनीच केला घात
मित्रांच्या समवेत
नाच गं घूमा.........
कशी मी नाचू ?
स्विकारुन नवऱ्याचा पॅरालिसीस
रिक्षेतच तयार केलं आॅफिस,
त्यागाच्या जीवनाला
स्वतंत्र अस्तित्व नसे मनाला
नाच गं घुमा.........
कशी मी नाचू ?
आता राहणार नाही दबून
काळाबरोबर धावीन
बुरसटलेल्या विचारांना तिलांजली मी देईन.
म्हणता म्हणता,
उसवली की हो चारित्र्याची वीण
नाच गं घुमा.........
कशी मी नाचू?