म्या कृषीवल हाय!!
म्या कृषीवल हाय!!
काव्यप्रकार मुक्तछंद
आता... शिवार कडाडलं, भुई बी भ्येगाळली, मनात चिंतेचं काहूर माजलंय...
द्येवा, कवा पाडशीन पानी? आरं, राब राबतुया रंऽ श्येतामंदी, पर कशी होवी उगवन?
घाम गाळून बेनं प्येरलं, आन डोळं लावू लावू बघतूय आभाळाकडं
समदी नखित्रं कोरडी चालल्या, आन डोळं बी त्याच्यावानीच... कोरडं...!
आता काय बी सुदरंना, घ्यावं का झाडाला लटकून?
आन माह्या माघारी हाय खातील बायको, पोरं , काय करू कारभारनीचं कुकू पुसून...?
न्हाई! म्या पोशिंदा त्यांचा आन तू आमचा!
आसं वंगाळ काम करन्यापरीस...?
हात मागतो जानकारांचा
संगं घ्येतो माज्या लक्षुमीला आन
पान्यासाठी हाक घालतो भुईला
झरं फुटूं द्ये तिच्यातून आन ढग बी फुटूं द्ये वरून
हासू द्ये रे हिरवं रान,
तुला माज्या घामाची आन!
माज्या घामाची आन!!
