मुलगा
मुलगा
सोडले वृद्धाश्रमी अन् बोलला मुलगा
"तात, येतो" वाट चालू लागला मुलगा
घास भरवाया सुखाचा नेहमी झिजला
त्याच बापाशी चुकीचा वागला मुलगा
तुच्छतेने पाहिले हो ज्यास विश्वाने
मायला का तोच सुंदर वाटला मुलगा
हुंदका दाटून आला बांधही फुटला
माय गेली अन किती आक्रोशला मुलगा
पाहिले डोळ्यात 'त्याच्या' प्रेम भरलेले
प्रेयसीला वाटला तो चांगला मुलगा
दाटला अंधार हा चोहीकडे आता
बाप गेल्यावर असा करवादला मुलगा
अंतकाळी सोबतीला ना कुणी आला
'पंडिता' बाजूस तेव्हा जाहला मुलगा
