मोहक निसर्ग
मोहक निसर्ग
हिरवे मखमली तृणपाती
डोलती वाऱ्यावर हळूवार
मोहक निसर्ग सजली सृष्टी
हा अनोखा वाटे चमत्कार...१!
रंगबेरंगी उमलली हो फुले
येई रंगसंगती छान जुळून
गंधाळला आसमंत सारा
सृष्टीची किमया येई कळून...२!
उमलल्या तृषार्त तरू वेली
चिंब चिंब जाहली वसुंधरा
डोंगरदऱ्या पसरली हिरवळ
निसर्गाचा आनंद घ्यावा खरा...३!
मेघराजा अवनीचे मिलन
सुंदर सजतो श्रावण मळा
मनभावन पवित्र मास हा
व्रतवैकल्याचा चाले सोहळा...४!
